सरनोबतवाडी हे गाव कोल्हापुर पासुन अवघ्या 2 कि.मि. आंतरावर आहे. पुर्वापास लोक या गावाला टेकाचीवाडी असे म्हणत होते. सरनोबत सरकार यांनी गावातील घरांसाठी जागा व शेत जमीन इनाम म्हणुन दिली म्हणुन त्यांच्या आडनावानेच गावचे नाव सरनोबतवाडी असे झाले. शेती हा मुख्य व्यवसाय असलेने गावाला चांगले वैभव प्राप्त आहे. राजाराम महाराज पुर्वी हत्ती घोडे घेउन शिकारीला जात असत, त्यावेळी लोकांना व जनावरांना पिण्य़ाच्या पाण्याची चणचण भासत असे म्हणुन राजाराम महाराजांनी तलाव बांधलेला आहे.
या तलावाचे वैशिष्टय म्हणजे कोणत्याही प्रकारचे सिमेंट वाळु न वापरता फक्त काळी माती वापरुन तलाव बांधलेला आहे. या तलावामुळे ९० एकर जमीन पाण्याखाली आलेली असुन पाण्याचा प्रश्न तलावामुळे सुटला. या तलावाला राजाराम तलाव म्हणुन ओळखले जाते. गावात हनुमान मंदीर, विठ्ठल मंदीर, दत्त मंदीर,बालाजी मंदीर व श्री शिवनाथ् भक्त मंडळ (आध्यात्मिक केंद्र) आहे. तसेच या मठामध्ये जगन्ननाथ महाराज यांनी आध्यात्मिकतेचा वेळ वाढवलेला आहे. त्यांच्या पश्चात संतोष महाराज यांनी परिसरातील १० ते १५ गावातील लोकांना आध्यात्मिक ध्यान केंद्रामधुन व्यसनमुक्ती दारुबंदी आदी शिकवण दिलेली आहे.
गावामध्ये भजणी मंडळ आहेत, दर गुरुवारी मठामध्ये व दर शनिवारी बालाजी मंदीरामध्ये भजणी मंडळ सेवा करतात. गाव १००% हगणदारी मुक्त असुन गांवाला निर्मलग्राम पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्कारातून मिळालेल्या २ लाख रुपये रक्कमेतून गटर्स व रस्त्यांची कामे केली आहेत. गावच्या विकासासाठी सर्व तरुण मंडळे व समस्त गावकरी मंडळींचे सहकार्य व श्रमदान लाभले आहे. निर्मल गाव व स्वच्छता कामासाठी बॅंक ऑफ बरोडा व ग्रामपंचायत सदस्य समितीच्या साहकार्यातुन आज अखेर १०० % शौचालये पुर्ण होत आहेत. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून ७५% रस्ते व गटार्सची कामे झाली आहेत.
गावामध्ये पहील्यांदाच महिला सरपंच म्हणुन सौ. सुर्वणा महादेव माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. गाव तंटामुक्त असून “स्वच्छता अभीयान” या माध्यमातुन श्री. किरण आडसुळ स्वच्छता कमीटीचे अध्यक्ष म्हणुन काम पाहत आहेत. तंटामुक्ती साठी श्री अमरसिंह सरनोबत काम पाहतात. गावाजवळ कृषी महाविद्यालय, औद्योगिक वसाहत व घाटगे पाटील यांमुळे गावातील रोजगारीचा प्रश्न मिटलेला आहे. गावाला ग्रामपंचायतमालकीच्या चार विंधनविहिरी असुन त्यामधुन गावाला पाणी पुरविले जाते. त्याचबरोबर प्रादेशिक विभागामधुन गावाला पाणी घेतले जाते. गावामध्ये ४०० खाजगी नळ असुन कनेक्शनसाठी रुपये एक हजार प्रमाणे पाणी पट्टी आकारली जाते.